चिपळूण ः रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, साहित्यिक आणि नवोदित लेखकांच्या काव्य प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने रेडिओ कोकण (90.4 ), चिपळूण यांच्या वतीने जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, 22 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत वनविभाग कॉन्फरन्स हॉल, मार्कंडी, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवयित्री व कादंबरीकार नीरजा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून विभागीय वन अधिकारी रत्नागिरी, चिपळूण गिरिजा देसाई पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या स्पर्धेसाठी ‘पाऊस’ हा विषय देण्यात आला होता, व स्पर्धा सर्व वयोगटासाठी खोली होती. 15 जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अशा एकूण 135 कवींनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व स्पर्धेला चांगली दाद दिली. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी रू. 3000, द्वितीय क्रमांकासाठी रू. 2000 आणि तृतीय क्रमांकासाठी रू. 1000 तर उत्तेजनार्थ रू.500 पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट अशा तीन कवितांना विशेष लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
रेडिओ कोकणचे संचालक युवराज मोहिते, समन्वयक प्रज्ञा मिलिंद जोगळेकर आणि काव्यस्पर्धा संयोजक उमेश कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, कवी आणि रसिकांनी पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.