दापोली : देशभक्ती, संगीत आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या लायन्स क्लब दापोली आयोजित देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी राधाकृष्ण मंदिर सभागृह, दापोली येथे झालेल्या या स्पर्धेने तब्बल आठ तास दापोलीकरांना देशभक्तीच्या सुरांमध्ये रंगवून ठेवले. सभागृह विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व नागरिकांच्या उपस्थितीने तुडुंब भरले होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लायन्स क्लब दापोलीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदा स्पर्धा जिल्हा परिषद गट आणि संस्था संचालित गट अशा विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष लायन गुरुप्रसाद बेर्डे, सौ. गौरी बेर्डे, लायन श्रीराम माजलेकर, लायन आशिष मेहता, लायन अस्मिता मेहता, लायन राजीव करंदीकर, लायन अतुल मेहता आणि लायन प्रमोद तलाठी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यानंतर लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष लायन गुरुप्रसाद बेर्डे यांच्या हस्ते अमर जवान ज्योत प्रज्वलित करून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच लायन्स क्लबचे संस्थापक मेल्विन जोन्स यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.