दापोली :-देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, युवा प्रेरणा कट्टा, दापोली यांच्या वतीने ‘एक राखी जवानांसाठी २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सैनिकांप्रती आदराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
‘राखीचा एक धागा… सैनिकांप्रती आपली कृतज्ञता!’ या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १२ वी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

हस्तनिर्मित राखी स्पर्धा
इयत्ता ५ वी ते ७ वी या गटातील विद्यार्थ्यांसाठी हस्तनिर्मित राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक व कल्पक राख्या या स्पर्धेसाठी सादर करावयाच्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव मिळणार असून, तयार केलेल्या राख्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम ठरणार आहेत.
सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र किंवा कविता लेखन
इयत्ता ८ वी ते १२ वी या गटातील विद्यार्थ्यांसाठी ‘सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र किंवा कविता लेखन’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला शब्दरूप देण्याची संधी विद्यार्थ्यांना या स्पर्धेतून मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील देशप्रेम, सैनिकांविषयीचा आदर आणि कृतज्ञता पत्र अथवा कवितेच्या माध्यमातून व्यक्त करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.