दापोली : आपल्या ओजस्वी शाहिरीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा जागर करणारे महाराष्ट्र गौरव भूषण शाहिर शंकर भारदे गुरुजी यांच्या कार्याची पंढरीने दखल घेतली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी ‘सेवा गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून, येत्या १५ ऑगस्ट रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात त्यांचा भव्य सन्मान करण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर नामयज्ञ ट्रस्ट यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार श्री संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सन्मान केवळ एका शाहिराचा नसून, भक्ती आणि शाहिरी परंपरेचा गौरव मानला जात आहे.
दापोली तालुक्यातील टेटवली गावचे सुपुत्र असलेल्या शंकर भारदे गुरुजींच्या लेखणीतून आणि आवाजातून आतापर्यंत पाचशेहून अधिक गाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. विशेषतः पांडुरंगाच्या भक्तीची महती सांगणारी भक्तिगीते तसेच आई-वडिलांचे महत्त्व अधोरेखित करणारी गाणी महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय झाली आहेत.
भारदे गुरुजींच्या गीतांची लोकप्रियता इतकी मोठी आहे की, महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनातून त्यांच्या गीतांचा आवर्जून दाखला देतात. भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा हा सुरेल प्रवास पाहता त्यांच्या कार्याची दखल घेऊन नामयज्ञ ट्रस्टने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
पंढरपूरच्या पावन भूमीत आपल्या गुरुवर्यांचा सन्मान होणार असल्याने त्यांच्या हजारो शिष्यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सन्मानामुळे टेटवलीसह संपूर्ण दापोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
