चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या वतीने चिपळूण तालुक्याच्या ठिकाणी (चिपळूण शहर व परिसरात) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे तसेच सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वसतीगृह स्व-मालकीच्या जागेत आणि स्वतंत्र अत्याधुनिक सुविधांसह नव्याने उभारण्यात यावे, यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करावा, याकरिता चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती (रजि.) चिपळूण यांच्यावतीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना चिपळूण प्रांत अधिकारी यांच्यामार्फत मंगळवारी (दिनांक १ रोजी ) निवेदन देण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चिपळूण येथे (खेर्डी उपनगरात) चालवल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह अनेक दिवस भाड्याच्या इमारतीत चालवले जात होते. मात्र अनेक असुविधानि ते ग्रासलेले होते. त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थी संख्येवर झाला आणि हे शासनमान्य वसतिगृह बंद पडण्याच्या स्थितीत गेले. आता ते पुन्हा भाड्याच्या जागेत सुरू करण्याचा प्रयत्न समाज कल्याण विभागाच्या वतीने केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती यांच्यावतीने मंगळवारी संस्थेचे सरचिटणीस संदेश पवार, शिक्षण समितीचे अध्यक्ष विलास सकपाळ गुरुजी, न्यायदान कमिटीचे माजी अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चिपळूणचे प्रांताधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण तालुका हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा शैक्षणिक व औद्योगिक दृष्ट्या विकसित होत असलेला तालुका आहे. शहर आणि परिसरात अनेक शिक्षण संस्था , महाविद्यालय कार्यरत आहेत . त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने येत असतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना राहण्याची गैरसोय होत असते. त्यामुळे समाज कल्याण विभागाच्या अत्यंत सुसज्ज अशा वसतिगृहाची आवश्यकता आहे. मात्र समाज कल्याणच्या वतीने जे वसतिगृह चालवले जात होते,ते अनेक कारणांमुळे बंद पडण्याच्या स्थितीत गेले. एकेकाळी शंभराहून अधिक विद्यार्थी त्यामध्ये प्रवेश घेत असत. परंतु स्वतःची इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. भाड्याच्या इमारतीत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या मूलभूत व शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयी निर्माण झाल्या. कालांतराने विद्यार्थी संख्या कमी होत गेली आणि अखेरीस ते बंद पडले. पुन्हा हे वसतीगृह सुरू करण्यासाठी भाड्याच्या जागेचा शोध विभागामार्फत घेतला जात आहे. वसतिगृह सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची आहे.
त्यासाठी चिपळूण शहर अथवा परिसरातील खेर्डी उपनगर, एमआयडीसी परिसर , नगरपालिका परिसर आधी मधील शासकीय जमीन यासाठी उपलब्ध करून त्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज वसतिगृहाच्या इमारती उभ्या केल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक वसतिगृहाची क्षमता किमान 100 विद्यार्थी असणे आवश्यक आहे. या परिसरातील शासकीय जागेची तातडीने निवड करून त्यासाठी निधी मंजूर करावा, भाड्याच्या इमारतींवर खर्च करण्याऐवजी स्वमालकीची इमारत बांधण्यावर निर्णय घ्यावा, नव्या इमारती बांधताना अत्यंत अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू असणाऱ्या मुला-मुलींच्या वस्तीगृहांच्या इमारती त्यांना साजेशा होणे आवश्यक असल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
भाड्याच्या इमारतीतील गैरसोयींमुळे पूर्वीचे वसतिगृह बंद पडले आहे. त्यामुळे पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात भाड्याच्या जागेत वसतिगृह सुरू करण्यापेक्षा एकदाच नियोजनबद्ध प्रशस्त, सुरक्षित, अत्याधुनिक आणि स्वमलकीच्या स्वतंत्र इमारती उभारणे हा विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि शासनाच्या दीर्घकालीन दृष्टीने आर्थिकदृष्ट्या ही योग्य निर्णय ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत, तसेच जिल्हाधिकारी, समाज कल्याणचे आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांना रवाना केले आहेत.
