सावर्डे : माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य सौ. पूजा शेखर निकम यांनी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा, उपलब्ध औषधसाठा तसेच नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी सौ. पूजा शेखर निकम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध भांडारगृहास प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध औषधसाठ्याची पाहणी केली. आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या औषधांचा साठा, औषधांची उपलब्धता तसेच रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांची स्थिती याबाबत त्यांनी वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच रुग्णांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीतपणे होत आहे का, याचीही त्यांनी प्रत्यक्ष चौकशी केली. नागरिकांना उपचारासाठी आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असून, याबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, दूषित पाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आलेल्या पाण्याच्या नमुन्यांची जैविक व रासायनिक चाचणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या चाचण्यांचे अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींना माहिती द्यावी. तपासणी अंती पाणी नागरिकांच्या वापरासाठी व विशेषतः पिण्यास योग्य आहे किंवा नाही, याबाबत ग्रामस्थांना तातडीने माहिती देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. अशा सूचना त्यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (PHC) ठेवण्यात आलेल्या विविध उपचारांच्या लसी आणि वॅक्सिन खराब होऊ नयेत, यासाठी संबंधित भागातील वीज पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये, अशी मागणी त्यावळी त्यांनी विद्युत सावर्डे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली व थेट विद्युत अधिकाऱ्यांना फोन करून या समस्येचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शने आणून दिले.
सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधसाठा व आरोग्य सुविधांचा माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य सौ. पूजा शेखर निकम यांनी घेतला सविस्तर आढावा…
