चिपळूण : रिगल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी गुणवैशिष्ट्यांना वाव देणारा आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणारा ‘इन्व्हेस्टिचर सेरेमनी’ (पदग्रहण सोहळा) मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून चिपळूण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. रूपाली दांडेकर उपस्थित होत्या. तसेच रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष सिद्धेश जाधव आणि सचिव मृणाल करंजकर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रिगल पब्लिक स्कूलच्या संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांनी भूषवले.
दीपप्रज्वलनाने आणि ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधी, शालेय मंत्रिमंडळ आणि विविध हाऊसेसच्या प्रमुखांना त्यांच्या अधिकाराचे सेंशेस
आणि बॅजेस देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निष्ठा, कर्तव्यदक्षता आणि शिस्तीची शपथ देण्यात आली.
आपल्या मार्गदर्शनात उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उत्तम नागरिक व उत्कृष्ट नेते बनण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रोटरॅक्ट क्लबचे सिद्धेश जाधव व मृणाल करंजकर यांनीही विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांचे कौतुक करत सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.
संस्थेच्या संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि आत्मविश्वासाचे बीजारोपण करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
