चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. दातार विज्ञान, डॉ. बेहेरे कला व श्री. पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), चिपळूण येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन काल गुरुवारी उत्साहात करण्यात आले होते.
कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी उपयोग आणि जैवविविधतेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक अधिवास व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
महोत्सवाचे उद्घाटन आमदार शेखर निकम, आमदार भास्करशेठ जाधव, आणि सभापती सूर्यकांत खेतले यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांच्या प्रदर्शनाची पाहणी करून विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.
यावेळी आमदार शेखर निकम आणि आमदार भास्करशेठ जाधव यांनी रानभाजी महोत्सवाचे कौतुक केले. कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व अशा उपक्रमातून नागरिकांसमोर आणणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. रानभाज्यांचे वैविध्य, त्यांचे पोषणमूल्य आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची माहिती अशा पद्धतीने प्रदर्शनाच्या माध्यमातून देत असल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. महाविद्यालयात भव्य स्वरूपात महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल सर्व संबंधितांचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
महोत्सवात कोकणातील विविध रानभाज्यांचे प्रदर्शन, रानभाजी विक्रीचे दालन, रानभाजी पाककृती स्पर्धा, भित्तिपत्रक व पोस्टर सादरीकरण तसेच रानभाज्यांवरील रील स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पाककृती स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी रानभाजीपासून तयार केलेले पदार्थ सादर केले. त्यासोबत पाककृती आणि त्यातील पौष्टिक गुणधर्मांची माहितीही देण्यात आली. या रानभाज्यांपासून बनविलेल्या पदार्थांची चव चाखत आमदार महोदयांनी व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पाककलेचे कौतूक केले
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभाग चिपळूण, चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. योगेश आगवेकर, प्रा. स्वरदा कुलकर्णी, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएस विभाग, महिला विकास कक्ष, स्वयंसिद्धा समिती आणि एग्रीकल्चर विभागासह संबंधित कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी विशेष प्रयत्न केले.
डीबीजे महाविद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात…
