लांजा : वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या ‘शोध नवमूर्ती कलाकारांचा’ या संकल्पनेतून राजापूर, लांजा आणि साखरपा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इयत्ता ५ वी ते ७ वी लहान गट आणि ८ वी ते १० वी मोठा गट अशा दोन गटांत तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर राजापूर, लांजा व साखरपा येथील दोन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांमधून विधानसभा क्षेत्राची अंतिम निवड करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते व सचिव मा. श्री. विनायकजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले होते.

या सर्व विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क कार्यालय, लांजा येथे पार पडला. लहान व मोठ्या दोन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विधानसभा स्तरावरील बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.