लांजा : (गोविंद चव्हाण) तालुक्यात जून ते ९ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यात घरे, गोठे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे एकूण ३ लाख २१ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद लांजा तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.

तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जून महिन्यात झालेल्या वादळी पावसात एक गोठा पूर्णपणे कोसळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच तीन पक्क्या घरांचे अंशतः नुकसान होऊन संबंधित नागरिकांना ८० हजार २५० रुपयांचा फटका बसला.

दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा वादळी वारा आणि मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले. १ ते ९ जुलैदरम्यान १४ घरांचे एकूण १ लाख ५६ हजार १०० रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय, एका ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

अशा प्रकारे जून ते ९ जुलै २०२६ या कालावधीत तालुक्यातील घरे, गोठे आणि सार्वजनिक मालमत्ता मिळून एकूण ३ लाख २१ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.