नवी दिल्ली : आदरणीय शरद पवार साहेब विधिमंडळात गेले होते,आमदारांना त्यांच्याशी काही बोलायचे होते. तेव्हा तिथे जवळच शिंदे साहेबांचे केबिन आहे. त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेब तिथे गेले, सगळ्यांना भेटायचे होते. शिंदे साहेबांच्या मनाचा मोठेपणा की, ते कॅबिनेटसोडून आले आणि आदरणीय शरद पवार साहेबांना भेटले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,जी घटना झाली. ज्या पद्धतीने झाली. तिथे काही बैठक नव्हती. आदरणीय शरद पवार साहेब हे विधानभवनात गेले. ते चालत येत असताना आमदारांना त्यांच्याशी काही बोलायचे होते. त्या ठिकाणी सर्वात जवळ शिंदे साहेब यांचे कॅबिन होते. विधानभवनात असे काही फिक्स कॅबिन नसतात. कॅबिनमध्ये आमदारांसोबत त्यांची चर्चा झाली. राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांशी गाठीभेटी झाल्या. त्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब तिथून बाहेर पडले. आमदारांसाठी ही भेट शिंदे साहेब यांच्या कॅबिनमध्ये झाली हा योगायोग होता. ही अगदी सहज झालेली घटना आहे,असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,मी ही काल संजय राऊत साहेब यांना फोन केला. त्यांना घटनाक्रम सांगितला. कुणीतरी राऊत साहेब यांना चुकीची माहिती दिली असेल, त्यामुळे गैरसमजातून हे सर्व झाले आणि ते बोलले, असे मला वाटते. जी घटना झाली, ती सर्वांनाच माहिती आहे. हे इतके सहज घडलं की त्याची बातमी झाली याचं मला ही आश्चर्य वाटलं. ही घटना ध्यानीमनीही नव्हती. कदाचित गैरसमजातून राऊत साहेब दुखावले गेले असतील. मी काल त्यांच्याशी फोनवर बोलले आहे,असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.