दापोली : दापोली तालुक्यात अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत (४ ते ७ जुलै २०२६) पोक्सो कायद्यांतर्गत तीन गंभीर गुन्हे घडल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठान व समस्त दापोली तालुक्यातील नागरिकांच्या वतीने तहसीलदार दापोली यांना १० जुलै रोजी निवेदन सादर करून सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना या दापोलीसारख्या सुसंस्कृत तालुक्यासाठी अत्यंत धक्कादायक, संतापजनक व लाजिरवाण्या आहेत. अल्पवयीन मुलीला मातृत्वास भाग पाडणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसेल, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच सर्व आरोपींना नागरिकांसमोर आणि माता भगिनीसमोर चाबकाचे फटके मारावेत,याचबरोबर डिसेंबर २०२५ मध्ये एका दिव्यांग युवतीवर ७२ वर्षाच्या वृद्धाने केलेल्या अत्याचार प्रकरणात अटक असलेल्या आरोपीलाही फाशीची शिक्षा देण्यात यावी .तसेच पीडित युवतीला शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना तहसीलदारांनी दापोली तालुक्यात घडलेल्या या सलग घटनांबाबत खंत व्यक्त केली. नागरिकांनी मांडलेल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे निवेदिता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रसंगी निवेदिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे, समन्वयक प्रा. डॉ. स्कंधा खेडेकर, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ, प्रा. कुणाल मंडलिक, डॉ. आनंद दांडेकर, मुग्धा सरदेसाई, श्रद्धा दांडेकर, वैष्णवी भागवत,महाविद्यालय प्रतिनिधी नेहल पवार यांनी आपल्या मनोगतामधून संताप व्यक्त करून कठोर शिक्षेची मागणी केली. या वेळी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांसह दापोली तालुक्यातील बहुसंख्य बंधू भगिनी उपस्थित होते.
दापोलीत पोक्सोच्या वाढत्या घटनांविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार; दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी…
