चिपळूण : चिपळूण जंक्शन रेल्वे स्थानकावर यापूर्वी रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे स्थानकावर कोणतीही तक्रार किंवा कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित बाब उद्भवल्यास संबंधितांना तालुक्याच्या पोलिस ठाण्यात जावे लागत होते.
चिपळूण रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र पोलिसांच्या अंतर्गत स्वतंत्र पोलिस चौकी असावी आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.
ही मागणी आता मान्य करण्यात आली असून, चिपळूण जंक्शन रेल्वे स्थानकावर रत्नागिरी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना तक्रारी किंवा कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित बाबींसाठी तालुक्याच्या पोलिस ठाण्यात जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे.
या निर्णयाबद्दल कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच संबंधित पोलिस अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.