चिपळूण : इंटरनेटच्या वेगवान युगात विद्यार्थ्यांना विचारांची स्थिरता, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्त्वाची समृद्धी मिळवून द्यायची असेल, तर वाचनाची सवय जोपासणे अत्यावश्यक आहे. वाचाल तर वाचाल’ हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध लेखिका सौ.संध्या साठे-जोशी यांनी येथे केले.
येथील विभा अरविंद ग्रंथालय, चिपळूण यांच्या वतीने बुधवारी दिनांक २९ जूलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ग्रंथालयाच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थीनीचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रंथपूजन व गुरूपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्ञान, संस्कार आणि वाचनसंस्कृतीचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका सौ.संध्या साठे-जोशी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. त्यानंतर ग्रंथालयाची माहिती सांगताना डॉ. माधव सोमण म्हणाले की, “ग्रंथालय म्हणजे ज्ञानयज्ञ असून ग्रंथ हेच आपल्या आयुष्यातील अक्षय गुरू आहेत,” असे सांगत ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले. पूर्वाश्रमीच्या घरडा वाचनालयाला नवसंजीवनी देत त्याचे आधुनिक विभा अरविंद ग्रंथालयात रूपांतर करण्यासाठी सुप्रसिद्ध डॉ. यतिन जाधव यांनी घेतलेल्या पुढाकाराचे व दिलेल्या भरीव योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री.बापूसाहेब काणे म्हणाले, “गुरू हेच जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ असतात. भगवान श्रीकृष्णांनाही सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गुरूकडून शिक्षण घ्यावे लागले. गुरूंचे स्थान जीवनात सर्वोच्च आहे.” यावेळी कु.सई यतिन जाधव , कु. रिकीता मंगेश वेस्वीकर (एमबीए), कु. निहार उमेश काटकर(एम. टेक), कु. संस्कृती उदय ओतारी(एल एल बी), कु. स्नेहल शिला ओतारी(एल एल बी), कु. रोशनी महेश विंचू( एल एल बी), कु. आर्या प्रकाश कदम( एम बी बी एस)आणि कु. मानसी मनेश म्हापदी (एम बी बी एस)या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.बापूसाहेब काणे, कार्यवाह श्री .विजय कदम, संचालक श्री.प्रसाद रिसबूड, सौ.मेधा बेटकर, श्री.प्रकाश गांगण, श्री. सुहास चव्हाण, कोषाध्यक्ष श्री. विनायक ओक तसेच श्री.प्रकाश घायाळकर, श्री.अनिल धोंडये सौ.मुग्धा मोरे, ग्रंथपाल कु. सुप्रिया खोत,सौ. पूर्वा कांबळी आदी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक आणि वाचनप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.