मुंबई : संजय राऊत, तुम्ही जनरल लायर आहात तर तुमचा पक्ष हा जनरल डायपरसारखा झाला आहे. पक्षात सुरू असलेली गळती तुम्हाला थांबवता येत नाही आणि तुम्ही अमितभाई शाह यांच्यावर टीका करता? ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून संजय राऊतांचा पोटशूळ उठला आहे. परंतु एक लक्षात घ्या, अमित भाईंचे नेतृत्व देशाने स्वीकारले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात देश पुढे जातोय.
जम्मू-काश्मीरमधील दगडफेकही कमी झाली पण तुमची पोटदुखी कमी व्हायला तयार नाही. आधी सारखा सारखा ओला होणारा आपला डायपर सांभाळा आणि मगच अमित भाईंवर टीका करा, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुलवामा किंवा पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा कुणी केला? गेल्या 70 वर्षांमध्ये 370 कलम काँग्रेसला हटवता आले नाही ते अमितभाईंनी हटवले. दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या विरोधात ते कंबर कसून लढत असल्याने संजय राऊत, तुम्हाला त्रास होतोय. पुण्यातील तज्ज्ञ समितीकडून लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार अमितभाईंच्या उपस्थितीत अजित डोवाल यांना दिला जातो आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. लोकमान्य टिळक यांनी ज्या देशाभिमानी वृत्तीने इंग्रजांविरोधात लढा दिला, त्याचप्रमाणे अमित भाईही लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन पाकिस्तान, बांगलादेशला धडा शिकवत आहेत. इतरांना दुषणे देण्यापलीकडे काही जमत नाही अशा संजय राऊत यांना मात्र पुण्यभूषण नव्हे तर पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे, अशा शब्दात श्री. बन यांनी खरडपट्टी काढली.
