सावर्डे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा जाज्वल्य वारसा आजच्या आधुनिक काळात जिजाऊंच्या लेकी सातासमुद्रापार अभिमानाने नेत आहेत. व्हिएतनाममधील ‘हा लाँग बे’ येथील विशाल महासागरात आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित ‘तिसरे आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन’ आणि शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
सावर्डे येथील आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्ष अनुजा राजे भोसले यांनी केलेले प्रभावी नियोजन आणि सूत्रसंचालन हे या संमेलनाचे आकर्षण ठरले. सातासमुद्रापार एका भव्य क्रूझवर, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय उद्योगपती डॉ. संजय वायाळ यांच्या हस्ते झाले.
अधिवेशनाच्या अध्यक्षा प्रा. मयुरा देशमुख यांनी महिलांच्या डिजिटल प्रगतीवर आणि उद्योग क्षेत्रातील संधींवर मार्गदर्शन केले. व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक ह्युन तुये आणि सोफिया यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
टोकियो (जपान) येथील सपना गायकवाड यांच्या शिवगर्जनेने आणि वनिता अरबट यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डेचे प्राचार्य मंगेश भोसले यांचा विशेष सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.
कतार देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्वाती पाटील यांनी जागतिक स्तरावरील संघटनाबांधणीवर प्रकाश टाकला.
या जागतिक सोहळ्यासाठी सुलभा कुंवर, दिपाली चौरे, वैशाली वायाळ, सुनंदा खैरनार, रेखा जाधव, नीलिमा वानखेडे, सत्यजित ठोसरे, दत्ता भालेराव आणि बजरंग सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसिद्धी प्रमुख संयुक्ता देशमुख यांनी तयार केलेल्या विशेष चित्रफितीचेही याप्रसंगी कौतुक झाले.
वैष्णवी जाधव आणि सुहानी व रेणुका हेरूळकर या कॉलेज कन्याही या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या.
सातासमुद्रापार पार पडलेला हा सोहळा आणि प्राचार्य मंगेश भोसले यांचा झालेला सत्कार ही कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
