चिपळूण : कोकणात पहिल्यांदाच सुरू झालेल्या ‘इनोवेट टेक अकॅडमी’च्या ऑटोमेशन प्रशिक्षण कोर्सेसची पहिली बॅच नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम खेर्डी येथील ग्रामपंचायत संकुलातील गाळा क्रमांक ११ व १२ येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्त्या दीप्ती सावंत-देसाई आणि आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सौ. अस्मिता श्रीधर सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांबद्दल समाधान व्यक्त केले. कुमारी आर्या सावंत हिचे वडील श्रीधर सावंत यांनी आभार मानताना सांगितले की, त्यांच्या मुलीला हा कोर्स करण्याची इच्छा होती; मात्र पनवेल येथे जाऊन शिक्षण घेणे दूर असल्याने शक्य नव्हते आणि सध्याच्या परिस्थितीत मुलींना येवढ्या लांब ठेवणे शक्य नाही त्यामुळे आता हा कोर्स चिपळूणमध्येच उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला.
तसेच नाईक कुटुंबातील निशांत यालाही ऑटोमेशन क्षेत्रात करिअर करायचे असल्याने स्थानिक पातळीवर हा कोर्स मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विधी सचिन देवळेकर, जी सध्या एका कंपनीत कार्यरत आहे, तिने या कोर्सचा आपल्या कामात मोठा फायदा होत असल्याचे सांगितले. शुभम भगत, जो कोका-कोला कंपनीत कार्यरत आहे, तो पार्ट-टाइम हा कोर्स करत असून त्यालाही या प्रशिक्षणाचा मोठा उपयोग होत असल्याचे नमूद केले.
कोकणातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या ऑटोमेशन कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाजवळ राहूनच आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेता येईल आणि स्थानिक पातळीवर येणाऱ्या उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार होईल.
या उपक्रमामागे यज्ञेश स. म्हाडदळकर यांची महत्त्वाची भूमिका असून, कोकणातील विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी हा उपक्रम स्थानिक पातळीवर सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.