चिपळूण : शहरातील बहादूरशेखनाका येथे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार दीपक दिलीप भागवत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी १० ते १५ जणांविरोधात आणि जातीवाचक शिवीगाळ केली या तक्रारीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रविंद्र पवार या दोघांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या दोन्ही गुन्ह्याचा तपास डीवायएसपी श्री बेले साहेब करीत आहेत.
या दोन्ही गुन्ह्यांची माहिती चिपळूण पोलिसांनी पत्रकारांना दिली. त्यापैकी पत्रकार दिपक दिलीप भागवत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका येथे एका पतसंस्थेविरोधात उपोषणकर्ते रुपेश सुरेश पवार (खेड) हे उपोषणाला बसले असताना त्याचे वृत्तांकन करण्यासाठी मी व माझा सहकारी कॅमेरामन रुपेश साळुंखे असे दोघे त्या ठिकाणी गेलो होतो.तेव्हा १० ते १५ लोकांनी ‘तू कसला पत्रकार, तू कसलं शुटींग करतोय’ असं बोलून आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. माझ्या ताब्यातील ID व इतर साहित्याची ही चोरी केली अशी तक्रार भागवत यांनी केली.
या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. ८२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९ (२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२ , ३५१(२), ३५१(३), महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४ प्रमाणे २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ वाजता गुन्हा रजिस्टर केला.
उपोषणकर्त्यासह दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
दुसरी फिर्याद अभिषेक चंद्रकांत मोहिते (वय २३ रा. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
फिर्यादी मोहिते यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी ११:३० वाजताच्या सुमारास बहादूरशेख नाका येथे आपण सरबत आणायला गेलो असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ३ ते ४ लोक बॅनर लावताना दिसले.त्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली तेव्हा त्यापैकी दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून अवमान केला व दम दिला. त्यावेळी तेथे काही लोक जमले व बाचाबाची झाली. तेव्हा आपल्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेली म्हणून फिर्यादी यांनी रुपेश पवार व रविंद्र पवार (दोन्ही रा. खेड) यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. ८३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३५१(२), ३(५), सह अनु. जाती व जमाती अत्याचार प्रति. अधि. १९८९ सुधारित २०१५ चे कलम ३(१)(आर)(एस) प्रमाणे २५ मार्च २०२६ रोजी रात्री ८:३८ वाजता परस्पर विरोधी गुन्हा रजिस्टर दाखल केला अशी माहिती चिपळूण पोलिसांनी दिली. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास डी. वाय. एस. पी. श्री बेले साहेब करत आहेत.
