लांजा : शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथे गणेश मंगल कार्यालयालगत भरवस्तीत मच्छीचे ट्रक उभे केले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०७ एएस १६१२ या क्रमांकाच्या ट्रकमधून मच्छी आणली जाते. विविध ठिकाणी मच्छीचे वितरण केल्यानंतर हा ट्रक गणेश मंगल कार्यालयाजवळ उभा करून ठेवला जातो. मच्छीचे वितरण झाल्यानंतर ट्रक धुतला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकाराला काही नागरिकांनी विरोध केला असता, ट्रकचालकाकडून शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

या प्रकरणी संबंधित विभाग, नगरपंचायत आणि पोलीस ठाण्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी नगर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.