जळगाव:- केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा एपस्टीनसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी हरदीप पुरी…. सांगा ये रिश्ता क्या कहलाता है ? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्र्यांना धारेवर धरले आहे.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, मानवी तस्करी तसेच आपल्याला विचारही करता येणार नाही अशा घाणेरडे कृत्य करणाऱ्या एपस्टीनसोबत देशाच्या एका केंद्रीय मंत्र्यांचा फोटो बाहेर आला आहे. ही बाब देशासाठी प्रचंड लाजीरवाणी आहे. आमचे बहुमत आहे, आम्ही काहीही करू अशा आविर्भावात नेहमीच या सरकारमधील माणसं असतात. जनाची नाही तर मनाची थोडीफार शिल्ल्क असेल तर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी या फोटोबाबत खुलासा करायला हवा असं त्या म्हणाल्या आहेत.
त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना आव्हान केले आहे की, एपस्टीनसोबत कोणती चर्चा करायला गेले होते ? सरकारमधील दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा सांगावा घेऊन गेले होते का ? की स्वतः एपस्टीनच्या काळ्या कृत्यांमध्ये सहभागी होऊन तोंड काळे करून आले आहेत ? या प्रश्नांचे उत्तर त्यांनी द्यावे.
