मुंबई : पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी १० दिवस आंदोलन करून भाजपा महायुती सरकारला झुकवले पण सरकारचे मंत्री आता या आंदोलनावर पातळी सोडून टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यातील विद्यार्थी आंदोलनावर केलेली टीका हा विद्यार्थ्यांचा घोर अपमान आहे. “मंत्री जयकुमार गोरे यांना मी दररोज ३ हजार रुपये देतो, त्यांनी आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत बसावे”, असे खुले आव्हान काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.
भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार विद्यार्थी विरोधी आहे, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. ७० हजार पदे रिक्त असताना सरकार त्याची भरती करत नाही, एमपीएससीच्या परिक्षांचे वेळापत्रक कोलमडलेले आहे, परीक्षा घेतली तर पेपरफुटी होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात भ्रष्ट कारभार सुरु आहे, तो सरकारला सुधारता येत नाही. विद्यार्थ्यांना १०-१० दिवस आंदोलन करावे लागते, या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा भाजपा सरकारने खेळखंडोबा करून ठेवला आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी कोणी आंदोलन केले तर सरकारला उत्तर द्यावेच लागते. पुण्यात राज्यातील गावखेड्यातील लाखो विद्यार्थी एमपीएससी परिक्षेची तयारी करत आहेत, मंत्री जयकुमार गोरे यांचे वक्तव्य हे या गोरगरिब, प्रामाणिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा अपमान आहे, त्यांनी जाहीर माफी मागावी, असे अतुल लोंढे म्हणाले.
विद्यार्थी आंदोलनामागे परकीय शक्ती आहे, असा मंत्री जयकुमार गोरे यांनी जावईशोध लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मजबूत?’, हातात मागील १३ वर्षे देश आहे तर मग परकीय शक्ती पुण्यापर्यंत आल्याच कशा? मोदी सरकार व फडणवीस सरकार काय झोपा काढत आहे का? कोणत्याही आंदोलनाला बदनाम करणे ही भाजपाची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी म्हणाले, विद्यार्थी आंदोलनात परकीय शक्ती, जंतर मंतर वरील आंदोलनातही परकीय हात आहे, देशद्रोही आहेत असे आरोप करून भाजपा स्वतःचे हसे करून घेत आहे. देश सांभाळता येत नाही तर खुर्चीवर बसलात कशाला? हेच विद्यार्थी तुम्हाला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही अतुल लोंढे यांनी दिला आहे.