रायगड : जिल्ह्यातील रोहा नगरीत भक्तीचा महासागर लोटला आहे! लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. ब्रिटिश काळापासून सुरू असलेली परंपरा आजही कायम असून, श्री धावीर महाराजांना यंदा १६५ वी सशस्त्र पोलीस मानवंदना देण्यात आली.रोह्याची ऐतिहासिक परंपरा, सशस्त्र पोलीस मानवंदनेचा मान आणि लाखो भाविकांची अपार श्रद्धा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा संपूर्ण रायगडचे लक्ष वेधून घेत आहे!
आज रायगड पोलीस दलातील २१ जवान आणि पोलीस बँड पथकाच्या उपस्थितीत ही मानवंदना अर्पण करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्यांचे पारंपरिक सूर आणि जयघोषाने संपूर्ण रोहा नगरी दुमदुमून गेली. या मंगलमय वातावरणात धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.
या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले असून, महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेल्या या सोहळ्याला राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही उपस्थिती लावली.
यावेळी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.