चिपळूण : चिपळूण-गुहागर महामार्गावरील पाचाड तळी स्टॉप येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात 4 जून रोजी सायंकाळी सुमारे 6.15 वाजता पाचाड तळी स्टॉप येथे घडला. याबाबत प्रदीप दत्ताराम शिरकर (वय 45, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. रामपूर कुंभारवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अविनाश गजानन कदम (रा. खेर्डी दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, विजय शांताराम शिरकर (वय 53, रा. रामपूर कुंभारवाडी) हे त्यांच्या ताब्यातील हिरो डेस्टिनी दुचाकी (एमएच-08-बीएल-5632) घेऊन फरशीतीठा येथून रामपूरकडे चिपळूण-गुहागर महामार्गावरून जात होते. त्यावेळी गुहागरच्या दिशेकडून येणारी व्हेन्यू कार (एमएच-08-एएक्स-7475) चालक अविनाश कदम यांनी भरधाव वेगात चालवत समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
ओव्हरटेक करताना कार विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत गेल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात विजय शिरकर यांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्या असून दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलिस करत आहेत.