चिपळूण : पत्नीला सासरहून आपल्या घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून एका 25 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना चिपळूण येथील गोवळकोट रोडवरील अस्मीना प्लाझा परिसरात घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 4 जून रोजी रात्री सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत फैजान सिकंदर चौगुले (वय 25, व्यवसाय ट्रॅव्हलिंग, रा. खेर्डी मोहल्ला) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अब्दुल शेख, शाहीद शेख, बाबू शेख, खालीद शेख, असलम शेख, फारुख बाबासाहेब शेख आणि आमान शेख (सर्व रा. गोवळकोट रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीदरम्यान संशयीत आरोपींनी ‌‘तू आमची मुलगी पळवून नेली आहेस, त्याची शिक्षा भोगत आहेस,‌’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच तक्रारदार यांनी घटनास्थळी आणलेल्या एमएच-08-झेड-9787 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मारुती सियाज कारवर दगड व बांबूने हल्ला करून वाहनाच्या काचा फोडत नुकसान केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.