खेड : तालुक्यातील घाणेखुंट गवळवाडी येथील नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान (वय २१, मूळ रा. करमाळ-वेरा, खेजडिया, ता. मारवाड, जि. राजस्थान) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, दि. १३ मे रोजी सकाळी ६.३० ते शनिवार, दि. १४ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या घटनेची खबर संजय मदनसिंग चौहान (वय ३९) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. मयत नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान आणि खबर देणारे हे हार्डवेअरच्या दुकानात एकत्र काम करीत होते. मंगळवार, दि. १२ मे रोजी मयत नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान हा दुकानात आला नव्हता. त्यामुळे त्याचा लहान भाऊ सतत मोबाईल फोन करीत होता; मात्र तो फोन उचलत नव्हता. अखेर मित्राच्या वडिलांच्या मदतीने घरी जाऊन कोणत्यातरी हत्याराने कडी-कोंडा उचकटून घरात प्रवेश केला असता, लाल रंगाच्या ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. त्याला कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, दि. १४ मे रोजी दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.