खेड : रत्नागिरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड येथील १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या दैदीप्यमान यशामुळे शाळेचे नाव संपूर्ण जिल्ह्यात उज्ज्वल झाले असून, संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल प्रशाला समितीचे चेअरमन राजेशभाई बुटाला यांनी विजयी संघातील खेळाडू आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्था व प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेतही संघाने उत्कृष्ट कामगिरी करून यशाची परंपरा कायम राखावी, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक धोत्रे , उपमुख्याध्यापक मस्के , सहायक शिक्षक साठे व जाधव सर, क्रीडा शिक्षक यादव , वरिष्ठ लिपिक चव्हाण , कनिष्ठ लिपिक कोकाटे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील या यशामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विभागीय स्पर्धेतील संघाच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.