रायगड : ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समितीने राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाभिमुख कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाला असून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, विधानपरिषद सभापती राम शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले आणि ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ मध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण १६३ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये खालापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. या सर्व ग्रामपंचायतींनी अभियानातील विविध घटकांवर नियोजनबद्ध पद्धतीने काम करत उत्कृष्ट कामगिरी केली.
हा पुरस्कार रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी संदीप कराड तसेच चौक व वडवळ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वीकारला.
ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामे, अभियानाच्या निकषांनुसार अंमलबजावणी, लोकसहभाग आणि विविध उपक्रमांमधील सातत्य या बाबींनी तालुक्याच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
जिल्हास्तरीय मार्गदर्शन, तालुकास्तरीय नियोजन आणि ग्रामपंचायत स्तरावरील प्रभावी अंमलबजावणी यांचा समन्वय या यशात महत्त्वाचा ठरला.
जिल्ह्यात ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमांना गती देणे, ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि लोकसहभागातून विकासकामे राबविणे या बाबींवर भर देण्यात आला.
खालापूर पंचायत समितीच्या राज्यस्तरीय यशासोबतच रायगड जिल्ह्यातील तळा, श्रीवर्धन आणि अलिबाग पंचायत समित्यांनीही अभियानात उल्लेखनीय कामगिरी बजावली.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले. या यशात योगदान देणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सरपंच आणि ग्रामपंचायत स्तरावरील सर्व घटकांचे त्यांनी कौतुक केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० मध्ये रायगड जिल्ह्याने यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी नव्या जोमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अभियान २.० मध्ये ग्रामपातळीवरील संस्था सक्षमीकरण , लोकसहभाग, जलसंधारणाच्या उपाययोजना आणि स्वच्छता या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करावे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील गरजा ओळखून विकासकामांचे नियोजन करावे आणि अभियानाच्या निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करत पुरस्कार मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमुद केले.
समृद्ध ग्रामपंचायत, सक्षम पंचायत समिती आणि विकसित जिल्हा परिषद — या ध्येयातून समृद्ध रायगडच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली आहे.
