खेड : अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या शुभम काणेकर यांच्या वारसांना ७५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत. न्यायाधीशांच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शुभम काणेकर हे पल्सर दुचाकीवरून जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर शुभम यांच्या वारसांना कायदेशीर न्याय व हक्काची नुकसान भरपाई मिळावी यासाठी खेड येथील प्रसिद्ध वकील अॅड. सुधीर बुटाला आणि अॅड. समीर शेठ यांच्यामार्फत जिल्हा न्यायालय, खेड येथे नुकसान भरपाईचा अर्ज दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. मोटार वाहन अपघात न्यायालयाचे न्यायमूर्ती चांदुगुडे साहेब यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विमा कंपनी आणि प्रतिवादींना एकूण ७५ लाख रुपये (६६ लाख रुपये मूळ रक्कम + अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून ८% दराने व्याज) मृताच्या वारसांना देण्याचे आदेश दिले.अॅड. सुधीर बुटाला आणि अॅड. समीर शेठ यांनी न्यायालयात मांडलेली कायदेशीर बाजू आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे शुभम काणेकर यांच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. या यशस्वी कायदेशीर लढ्याबद्दल आणि वारसांना हक्काची भरपाई मिळवून दिल्याबद्दल दोन्ही नामांकित वकिलांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.