चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते नाका परिसरात ३३ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. विकास सिद्धार्थ जाधव असे या तरुणाचे नाव असून, त्याची काळ्या रंगाची सँक, मोबाइल आणि अन्य साहित्य आढळून आले आहे. तो नातेवाईकांनाही दिसत नसल्याची फिर्याद मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयाने अपहरण झाल्याच्या संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास सिद्धार्थ जाधव (वय ३३, मूळ रा. तळसर, वरची बौद्धवाडी, ता. चिपळूण; सध्या खेर्डी येथे वास्तव्यास) हा ११ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंबस्ते नाका येथील इंदिरा वेल्डिंग वर्क्सच्या शेजारी, वाशिष्ठी नदीपात्रालगत पुलाजवळील भागात असताना बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्याची काळ्या रंगाची सँक, मोबाइलसह अन्य वस्तू सांडपात्राच्या ठिकाणी आढळून आल्या. त्यानंतर फिर्यादी सिद्धार्थ शिरोळकर (वय ६०, व्यवसाय शेती, रा. अडरे, बौद्धवाडी, ता. चिपळूण) तसेच अन्य नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. मात्र, विकासचा ठावठिकाणा लागला नाही. विकासचा शोध घेण्यासाठी तो मिळून न आल्याने त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, असा संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
विकास जाधव बेपत्ता होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचे साहित्य घटनास्थळी आढळल्याने या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, अपहरण झाल्याची बाब अद्याप तपासातून सिद्ध झालेली नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बेपत्ता तरुणाचा शोध आणि घटनेमागील नेमके कारण उघड होण्याकडे आता लक्ष लागले आहे.
