मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात पंचतारांकित हॉटेल असावे, हे रत्नागिरीवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडले आहे. उद्योग, गुंतवणूक व सेवा, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) रत्नागिरीतील झाडगाव औद्योगिक क्षेत्रात पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी मे. शेलार प्रॉपर्टीज प्रा. लि., मुंबई यांना ‘लेटर ऑफ कम्फर्ट’ जारी केले आहे.

महाराष्ट्र शासनासोबत ‘गुंतवणूक परिषद 2026’ मध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या (MOU) अनुषंगाने संबंधित कंपनीने एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह (भाप्रसे) यांना पत्र दिले होते. त्या पत्रासोबतच आणि कंपनीचा प्रस्ताव सकारात्मकरीत्या विचारात घेण्यात आल्यासंदर्भातलं पत्र एमआयडीसीकडून संबंधित कंपनीला देण्यात आले आहे.
रत्नागिरीजवळील झाडगाव औद्योगिक क्षेत्रात प्रस्तावित भूखंड वाटपासाठी हे पत्र देण्यात आले आहे. एमआयडीसीच्या कम्फर्ट लेटर धोरणानुसार, वाणिज्यिक दराने 3 एकर जमिनीसाठी 5 टक्के आरक्षण रक्कम भरावी लागेल. हे आरक्षण 6 महिन्यांसाठी वैध राहणार आहे. 6 महिन्यांच्या आत ऑनलाईन अर्ज करून अंतिम भूखंड वाटप न घेतल्यास आरक्षण रक्कम जप्त केली जाणार आहे.
एमआयडीसीचे सर्व प्रचलित नियम व अटी लागू राहतील.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरीचे पर्यटन, उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्र वेगाने पुढे जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना, उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी पंचतारांकित हॉटेल ही काळाची गरज होती. रत्नागिरीवासियांचे हे स्वप्न पूर्ण होत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळतील आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.”
या प्रकल्पामुळे रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्राला नवी उंची मिळेल, हॉटेल, वाहतूक, स्थानिक व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात रोजगारनिर्मिती होईल, तसेच कोकणच्या पर्यटन विकासाला मोठा हातभार लागेल, असा विश्वासही डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.