चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ तसेच मा. उच्च न्यायालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार चिपळूण नगरपरिषदेतर्फे यंदा ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यास प्रोत्साहन देणे, तसेच नागरिक व मूर्तिकारांचा या उपक्रमात सहभाग वाढविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
या स्पर्धेत ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा (वैयक्तिक)’ आणि ‘श्री गणेश मूर्तिकार/कारखानदार स्पर्धा’ अशा दोन विभागांचा समावेश करण्यात आला आहे.
घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. यासोबत सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.
मूर्तिकार/कारखानदार स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७५० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह, शाल, शिल्ड व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.
घरगुती सजावट स्पर्धेसाठी मूर्ती व सजावट संपूर्णपणे नैसर्गिक असावी, थर्माकोल, पीओपी व प्लास्टिक साहित्याचा वापर करू नये, तसेच विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.
मूर्तिकार स्पर्धेसाठी पीओपी मूर्तीचा वापर न करता लाल गेरू चिकण मातीचा वापर करणे आवश्यक असून, ग्राहकांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. तसेच मूर्तिकारांनी आपल्या कारखान्यातून जाताना शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक मूर्ती विक्री करणे आवश्यक आहे.
स्पर्धेचा अंतिम विजेता अनंत चतुर्दशीनंतर घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी विनामूल्य अर्ज चिपळूण नगरपरिषद स्वागत कक्ष येथे उपलब्ध असून, पूर्ण भरलेले अर्ज १३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी उद्यान विभाग प्रमुख श्री. प्रसाद साडविलकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चिपळूण नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.
“पर्यावरणपूरक गणेशोत्सव — आपली जबाबदारी!” या संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.