खेड : तालुक्यातील सात्विण गाव येथे वनविभागाच्या माध्यमातून उभारलेल्या निसर्ग माहिती केंद्राचे लोकार्पण रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
खेड तालुक्यांमध्ये लोटे अतिरिक्त एमआयडीसी ला लागूनच वनविभागाच्या वतीने ११३ हेक्टर जमिनीत संरक्षित वनक्षेत्र तयार केले आहे. या वनक्षेत्रामध्येच सुमारे ४२ लाखांच्या खर्चाने एक सुंदर असे निसर्ग माहिती केंद्र उभारले आहे. या निसर्ग माहिती केंद्रामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पर्यटक तसेच महाराष्ट्रातील ही पर्यटकांना रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग वनस्पती आणि जैवविविधता यांच्या बद्दल सखोल माहिती घेण्याची सुविधा मिळणार आहे. ‘रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती, सापांच्या प्रजाती पक्षी आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत? त्या पक्षी आणि प्राण्यांचे आयुष्यमान तसेच निसर्गातील वावर याबद्दलही सखोल माहिती येथे मिळणार आहे,’असे या निसर्ग माहिती केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रस्तावनेत विभागीय वन अधिकारी सौ गिरीजा देसाई यांनी यावेळी सांगितले. हे माहिती केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आम्ही पालकमंत्र्यांना दिला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या डीपीडीसी फंडातून याला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल वनविभागाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो असेही त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी या सुंदर उपक्रमाबद्दल वनविभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आभारही मानले. यामुळे कोकणातला निसर्ग संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याला मदत होईल. वनविभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अंगावर खाकी वर्दी असते अशी खाकी वर्दी फक्त आपल्याकडे तीन खात्यांमध्येच असते आणि या तिन्ही खात्यांचे कर्तव्य कायदा व सुव्यवस्था राखणे, बेकायदेशीर व्यवसाय रोखणे आणि आपला निसर्ग व जैवविविधता यांचे संरक्षण करणे हे असते. त्यामुळे वन विभागानेही आपल्या खाकीशी प्रामाणिक राहून आपला निसर्ग आणि वनसंपदा यांचे रक्षण करावे केवळ पास डोळ्यांसमोर ठेवून काम करू नये, असा खोचक सल्लाही दिला. हा निसर्ग आणि कोकणातील जैवविविधता संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वनविभागाबरोबरच विद्यार्थ्यांची सुद्धा आहे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे येऊन आपल्या कोकणातल्या निसर्गाची आणि पक्षी व प्राण्यांची माहिती घ्यावी. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम जरी सुरू करावयाचा असेल तरी त्यासाठी माझ्या माध्यमातून निधी दिला जाईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या सोहळ्या वेळी सर्वप्रथम निसर्ग माहिती केंद्राच्या इमारतीवरील श्रेय नामावली फलकाचे अनावरण करण्यात आले त्यानंतर फीत कापून माहिती केंद्राचे उद्घाटन व वटवृक्षाची पूजा करून त्याला पाणी घालण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण खेडचे माजी आमदार संजय राव कदम माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र उर्फ बापू आंब्रे खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील तहसीलदार सुधीर सोनवणे, पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
