रत्नागिरी : जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पीपास या घातक रसायनाच्या उत्पादनावरून वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून कोकणात जनआंदोलनाची ठिणगी पडली असून ६ एप्रिल रोजी खेड येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिपळूण ऐवजी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन कंपनीवरील सर्व आरोप फेटाळून लावले.
लोटे एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पीपास या रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. हेच रसायन इटलीमध्ये प्रदूषणाच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या प्रकल्पाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कोकणातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता वाढली असून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सोमवारी ६ एप्रिल रोजी खेड येथे कंपनीविरोधात मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, वाद वाढल्यानंतर कंपनीकडून पहिल्यांदाच अधिकृत भूमिका मांडण्यात आली आहे. कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावत, पीपास रसायनाचे उत्पादन करताना सर्व पर्यावरणीय नियमांचे पालन केले जात असल्याचा दावा केला आहे.
तसेच, या रसायनामुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. इटलीतील प्रकरणाशी तुलना करणे चुकीचे असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.याशिवाय, कंपनीकडून स्थानिक ग्रामपंचायतींना माहिती देत नागरिकांच्या शंका दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.
