मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांचे आज, ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘नाना, तुमचं जाणं मनाला चटका लावून गेलं. माझ्यावर प्रेमाने रागावणारा, चिडणारा माणूस गेला,’ अशा शब्दांत सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उदय सामंत म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते, संवेदनशील माणूस, स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक बांधिलकी जपणारा त्यांचा जिवलग मित्र नाना पाटेकर आज आपल्यातून निघून गेला, ही बातमी मनाला सुन्न करणारी आहे.
नाना पाटेकर यांच्यासोबतचे संबंध केवळ परिचयापुरते किंवा सार्वजनिक जीवनापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्यात जिव्हाळ्याचे आणि मनापासूनचे मैत्रीचे नाते होते, असे सामंत यांनी सांगितले. अनेक प्रसंगी नानांसोबत झालेला संवाद, त्यांचा परखडपणा, माणसांकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टिकोन आणि एखादी गोष्ट मनापासून पटली की त्यासाठी उभे राहण्याची त्यांची वृत्ती कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.
अभिनयाच्या क्षेत्रात नाना पाटेकर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील असंख्य भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीने अजरामर केल्या. पडद्यावरील त्यांचा आवाज, संवादफेक, डोळ्यांतून भावना व्यक्त करण्याची शैली आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावून जाण्याची त्यांची क्षमता पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, असे सामंत यांनी म्हटले.
‘पडद्यावरचा नाना जितका मोठा होता, त्यापेक्षा माणूस म्हणून भेटलेला नाना अधिक मोठा होता,’ अशा शब्दांत त्यांनी नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले.
‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, दुष्काळग्रस्त भाग आणि जलसंधारणासाठी केलेले कार्य त्यांच्या सामाजिक जाणिवेची साक्ष देणारे होते, असे सामंत यांनी सांगितले.
कोकणच्या मातीशी नाना पाटेकर यांचे विशेष नाते होते. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून कोकणात झालेल्या विविध सामाजिक आणि जलसंधारणाच्या कामांशी त्यांचा असलेला जिव्हाळा आपण जवळून अनुभवला असल्याचे सामंत यांनी म्हटले. या कामाच्या निमित्ताने दोघांमधील संवाद अधिक घट्ट झाला. समाजासाठी काहीतरी करण्याची नानांची तळमळ आणि त्यामागची प्रामाणिक भावना नेहमीच प्रेरणा देणारी होती, असे त्यांनी नमूद केले.
‘नाम फाउंडेशन’च्या कार्यात सहभागी होताना नाना पाटेकर यांच्यासोबत अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली. २०२५ मध्ये ‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्ती सोहळ्यातही एकत्र येण्याचा प्रसंग आला होता. त्या वेळी त्यांच्या सामाजिक कार्याची व्यापकता आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड पुन्हा प्रकर्षाने जाणवली, असे सामंत यांनी सांगितले.
नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना सामंत यांनी म्हटले की, ‘आज नाना आपल्यात नाहीत, ही वस्तुस्थिती स्वीकारणं अत्यंत कठीण आहे. एक उत्तम अभिनेता गेला, एक संवेदनशील माणूस गेला, एक सामाजिक कार्यकर्ता गेला; पण त्याहूनही अधिक माझा एक जिवलग मित्र आणि मार्गदर्शक गेला.’
नाना पाटेकर यांच्या आठवणी सदैव सोबत राहतील. त्यांच्या अभिनयाचा वारसा, स्पष्टवक्तेपणाची भूमिका, माणुसकीची शिकवण आणि समाजासाठी केलेले कार्य पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
‘भावपूर्ण श्रद्धांजली, नाना! तुमची उणीव कायम जाणवत राहील,’ अशा शब्दांत उदय सामंत यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
