चिपळूण ( सुनील साळवी ): मोठे ध्येय असेल- टीम वर्क असेल तर जिद्दीने काम करता येते. मग अडचणींचा डोंगर का समोर असेना तो सहीसलामत पार करून उद्दिष्ट गाठता येते. हेच पोखरण अणुचाचणीच्या वेळी घडून आल आणि अणुचाचण्या यशस्वी झाल्या देशासाठी या अपूर्व कामगिरीत मला योगदान देता आलं यासाठी मी राष्ट्राचा कृतज्ञ आहे अशा शब्दात प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
चिपळूणमध्ये चतुरंग प्रतिष्ठान तर्फे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात दोन दिवसीय कोकण अभ्यासवर्ग विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. काल शनिवारी संमेलनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची पोखरण अणुचाचणी (धोरण,विचार, दिशा, आखणी ) या विषयांवर श्री आदित्य शिंदे यांनी बहारदार मुलाखत घेतली अत्यंत मोकळेपणाने डॉ. काकोडकर यांनी उत्तरे दिली. त्यामुळे मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.

50-52 डिग्री तापमानात काम

पोखरण मध्ये अणुचाचण्यांच्या कार्यक्रमाचा किस्सा सांगताना डॉ. काकोडकर म्हणाले, त्या भागात 50 ते 52 अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापमानात काम करावे लागत होते. तप्त वाळू नेहमी वाहत असते.या गरम वाळूचा शरीराला स्पर्श झाला तरी मोठा दाह निर्माण होतो.अनेक महिने अशा वातावरणात अत्यंत नियोजनपूर्वक आणि चिकाटीने व जिद्दीने काम केले. संपूर्ण टीम हातात हात घालून खांद्याला खांदा लावून राष्ट्रासाठी योगदान देत होती. हे अत्यंत गोपनीय कार्य होते. आकाशातून परदेशी सॅटॅलाइटचाही वॉच होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वांनी स्पिरिटने काम केले आणि त्यामध्ये अभूतपूर्व यश आले. असे सांगताच संपूर्ण सभागृहात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

नाव बदलले मार्ग बदलला…

पोखरण अणुचाचणी हा विषय गोपनीय होता. मला पोखरणला जाण्याचे आदेश देण्यात आले, तेव्हा दुसऱ्याच्या नावे विमानाचे तिकीट काढले सरळ जाण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गाने गेलो. असा किस्सा त्यांनी सांगितला. माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची थोरवी गाताना डॉ. काकोडकर यांनी सांगितलेल्या आठवणीने उपस्थित श्रोते भारावून गेले. डॉ. काकोडकर म्हणाले मला डॉ. कलाम कोण हे माहीत नव्हते. मी त्यांना कधी भेटलेलो ही नाही. एरवी नामांकीत व्यक्ती आहे हे आपल्याला पटकन लक्षात येते. मात्र डॉ. कलाम याला अपवाद ठरले.अपार बुद्धिमत्ता आणि कर्तृत्ववाने मोठे असलेले डॉ. कलाम यांची राहणी अत्यंत साधेपणाची होती . समाजाने यातून बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.

समाज अन देशासाठी सकारात्मकता हवी…

एखादा मुलगा काही चांगला प्रयोग करीत असेल तर पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे आपण सुरुवातीलाच सांगतो तुला तुला हे जमेल का? नको करूस या उत्तरामुळे एखादा नवीन प्रयोग जन्माला येत नाही. कार्यालयात कोणी नवीन संकल्पना मांडत असेल तर ती स्वीकारली पाहिजे. बदल सृजन हे घडलेच पाहिजे असे बदल तंत्रज्ञानात नेहमी होत असतात म्हणून आज आपण नवनवीन गोष्टी ,वाहने , वाद्य पाहतो, खरेदी करतो आणि आपल्या जीवनात अंगीकारतो. अशी सकारात्मकता दाखवली तर निश्चितच समाज आणि राष्ट्र पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तरुणाईचे सबलीकरण अन ग्रामीण विकास

विकसित भारताचे स्वप्न कसे साकार होईल या प्रश्नावर डॉ. काकोडकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले.या विषयावर भाष्य करताना ते म्हणाले की देशातील तरुणाई शहरीपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक आहे.आज कोरोना नंतर ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना वाढीस लागली हाच धागा पकडून ते म्हणाले की वर्क फ्रॉम होम चालते तर वर्क फ्रॉम व्हिलेज का नको.ग्रामीण भागात राहणाऱ्या युवा पिढीच्या जडणघडणीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शहरी भागात राहूनच विकासाची प्रक्रिया राबविता येते ही चुकीची धारणा आहे. ग्रामीण भागातून विकासाची प्रक्रिया अतिशय गतिमान करता येणे शक्य आहे त्याकरिता प्रयत्नांची गरज आहे. ग्रामीण जीवन हे खूप संपन्न आहे मला स्वतः ग्रामीण जीवनाची ओढ आहे. आपण शेतीवर सर्वाधिक भर दिला पाहिजे त्यातून शहरीपेक्षा दरडोई उत्पन्न जास्त मिळेल आणि अर्थकारण बदलून शहर व ग्रामीण ही विषमता संपुष्टात येईल असे विवेचन त्यांनी मांडले.

आत्मनिर्भर आणि अवलंबित

अजूनही आपण काही महत्त्वाच्या घटकांसाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून आहोत.गॅस, तेल, कोळसा आपण मोठ्या प्रमाणात परदेशातून आयात करतो. विकसित भारत होण्यासाठी आपण आपले रिसोर्सेस वाढवून आत्मनिर्भर बनायला हवे आणि इतरांचे अनुकरण नको. आज राष्ट्रासाठी प्रत्येक जण योगदान देतोय त्यातून आर्थिक प्रगती होतेच देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.