खेड : तालुक्यातील चोरवणे येथील श्रीरामवरदायिनी देवीची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी चैत्र पौर्णिमेला गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात साजरी होणार आहे. हि देवी साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे.
. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत व सह्याद्री पर्वतरांगांवर विराजमान झालेल्या स्वयंभू नागेश्वर – देवस्थानच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसले आहे. या निसर्गरम्य – गावातील जागृत ग्रामदेवता श्रीरामवरदायिनी देवी आदिशक्तीचे रूप म्हणून प्रसिद्ध आहे. देवीचे मंदिर हेमाडपंथी असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी ८ वाजता मंदिरात स्थापित देवदेवतांची महापूजा, सकाळी ९ ते १० वाजता लाटेची पुजा व लाट पाडणे, सकाळी १० ते १२ वाजता लाटेची मिरवणूक, दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वाजता लाट बगाडावर चढवणे, ६ ते ७ वाजता देवीची महाआरती, रात्री ८ ते ९.३० वाजता महाप्रसाद, रात्री ९:३० ते १०:३० निमंत्रित पालख्यांचे आगमन, स्वागत, पालखी भेट रात्री १०:३० ते १२ वाजता निमंत्रित पालख्यांसह श्रीरामवरदायिनी मातेचा छबिना (पालखी प्रदक्षिणा), रात्री १२ वाजता आराध्य प्राप्ती प्रस्तुत शाहीर रत्नाकर महाकाळ यांचा लोकनाट्य तमाशा. यात्रेनिमित्त निमंत्रीत पालख्या श्रीकेदारनाथ देवस्थान (निवे), श्री मानाई माता देवस्थान (कुरवल खेड), श्री कालभैरव देवस्थान (सापिर्ले ), श्रीकाळीश्री देवस्थान (वालोटी), श्रीचंडिका माता देवस्थान (वावे), श्रीवाघोबा देवस्थान (ऐनवरे) येणार आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ, श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी व ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.