खेड : भगवान श्रीराम हे समन्वय स्वरूप आहेत.त्याप्रमाणेच वाल्मिकी रामायण हे सुध्दा समन्वय स्वरूपच आहेत. खरा पुरुषार्थ म्हणजे म्हणजे भगवान श्रीराम. भगवान श्रीराम हे आदर्श जीवनाचे प्रतिक आहेत, असे पारमार्थिक मार्गदर्शन ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. नामदेव कुमठेकर यांनी तालुक्यातील सुकीवली येथील औदुंबर श्रीदत्त देवस्थान येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात श्रीराम जन्मावर आधारित प्रवचन करताना केले. हा सोहोळा भाविकांच्या उपस्थितीत विविध आध्यात्मिक उपक्रमांनी उत्साहात पार पडला.
सुकीवली येथील औदुंबर श्रीदत्त देवस्थान मठामध्ये गुरुवारी २६ मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. श्रीकांत चाळके यांच्या निवासस्थानी श्रीसत्यनारायण पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्रवचनकार ह. भ. प. नामदेव कुमठेकर यांचा प्रवचन कार्यक्रम पार पडला. भगवान श्रीराम हे कोणत्याही एका संप्रदायाचे नसून ते सर्व समन्वयक असे स्वरूप आहे. ते मर्यादित पुरुषोत्तम आहेत. षडरिपूवर मात करीत त्यानी जीवन जगण्याचा मनुष्याला परिचय करून दिला आहे. अशा शब्दात त्यांनी रामायणाचे महत्व उपस्थित भाविकांना समजून सांगितले. विशेष म्हणजे हे प्रवचन ऐकण्यासाठी श्वान देखील उपस्थित राहिले.
औदुंबर श्रीदत्त देवस्थानचे संस्थापक ह. भ. प. श्रीकांत चाळके यांनी २००७ मध्ये भगवान श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ केला आहे. सलग १९ वर्ष हा सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा होत आहे. यावर्षी देखील सकाळपासूनच भाविकांनी भगवान श्रीरामाचे दर्शन घ्यायला सुरुवात केली होती. दुपारी ११:४० वाजता भगवान श्रीराम यांना अभिषेक करण्यात आला नंतर मूर्ती पाळण्यामध्ये ठेवण्यात आली. आणि दुपारी १२ वाजता जन्म सोहळा पार पडला. यावेळी भगवान श्रीराम यांना आळवून उपस्थित महिलांनी पाळणा गीते गायली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी उपस्थित सर्व भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले. सायंकाळी हरिपाठ, भजन या कार्यक्रमात सोबतच प्रवचनकार ह.भ.प. नामदेव कुमठेकर यांनी भगवान श्रीराम यांच्या आदर्शवत गुणांचा उपस्थितांना परिचय करून दिला. त्यानंतर पुन्हा सर्व भाविकांना अन्नदान करण्यात आले. रात्रीच्या जागरण कार्यक्रमांमध्ये सुकिवली गौळवाडी येथील ग्रामस्थांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकिवली येथील ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच संत मंडळींचे सहकार्य लाभले.