मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या पक्षांनी, विविध रिपब्लिकन गटांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झाले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष पोहोचवला असून, लवकरच या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची घोडदौड सुरू आहे.

रिपब्लिकन पक्ष अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी पक्षात सामील व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

आंबेडकरी चळवळीतील विविध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात सामील झाले पाहिजे. रिपब्लिकन पक्ष अधिक बलशाली करण्यासाठी विचारवंतांनी निळा झेंडा हाती घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे, मुंबई अध्यक्ष मंगेश पगारे, राज्य महासचिव डॉ. उमेश पवार, राज्य उपाध्यक्ष अशोक तांबे, शशिकांत शिंदे, मोहन बोदडे, नरसिंह मुच्छा कट्टा, भीमसेन जाधव, रोहिदास वाघमारे, अनिल लागाडे, गोविंद साळवी, विक्रम बमना, विजय पंडागळे, तुकाराम हेगडे, चंद्रकांत रुपेकर, कविताताई निकम, फिरोज शेख, राजू पांचाळ, जोनभाई सांडेवाल, सारिकाताई सकपाळ, राजू कवंदर, लक्ष्मी अम्मा देवेंद्र, माधव कट्टार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव यांनी आपल्या समर्थकांसह केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षातून बाहेर पडून मिलिंद सुर्वे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते कार्यरत होते. त्या गटाचा आज रिपब्लिकन पक्षात विलय करण्यात आला.

तसेच डॉ. रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वाखालील अनेक कार्यकर्त्यांनीही रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे अनेक छोटे-मोठे गट आणि संघटना स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभर विस्तारत आहे.

नागालँड आणि मणिपूर या राज्यांत रिपब्लिकन पक्षाला मान्यता आहे. आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाल्यास पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. भाजप, काँग्रेस, बसपा आणि आम आदमी पक्षानंतर रिपब्लिकन पक्षालाही लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी रिपब्लिकन पक्षाला ‘गन्ना किसान’ हे चिन्ह देण्यात आले आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये पक्षाने उमेदवार उभे केले आहेत, तर पाँडिचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला पाठिंबा दिला आहे.