खेड : -. तालुक्यात बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना टळल्याची धक्कादायक घटना घडली. बिजघर ते खेड दरम्यान धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा कोंडवाडी परिसरात अचानक ब्रेक निकामी झाल्याने अपघाताची स्थिती निर्माण झाली.

मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही एसटी बस नेहमीप्रमाणे प्रवासी व शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन खेडकडे निघाली होती. बसमध्ये सुमारे ३० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. कोंडवाडी परिसरात पोहोचताच अचानक बसचे ब्रेक निकामी झाले. बसचा वेग वाढू लागल्याने काही क्षण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गंभीर परिस्थितीत चालकाने धाडस व प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळवून थांबवली. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात एका वृद्ध महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.