मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिलेल्या ४८ तासांच्या आवाहनाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आंबेडकर म्हणाले की, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, गोंदिया, भंडारा, जळगाव, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी आणि विविध संघटनांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत केंद्र सरकारविरोधातील भावना व्यक्त केली. या आंदोलनाला डावे पक्ष, काँग्रेस तसेच विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, अशी मागणी केली.

महाराष्ट्र बंद शांततेत पार पडल्याचे सांगताना त्यांनी अकोल्यातील मूर्तिजापूर येथे दुकानांची तोडफोड झाल्याची एक घटना वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. पुढील आंदोलनाचा आराखडा जंतर-मंतरवरील आंदोलनकर्ते, विविध पक्ष आणि संघटनांशी चर्चा करून ठरवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि गुणवत्तेशी (मेरिट) खेळ सुरू असल्याचा आरोप करत, पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस आराखडा जाहीर करेपर्यंत दिल्लीतील आंदोलन सुरू राहील आणि त्याला महाराष्ट्रातूनही पाठिंबा कायम राहील, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.