मुंबई : काल आदरणीय शरद पवारसाहेब जंतर-मंतरवर गेले होते. तिथे आंदोलकांना भेटले. 22 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली असावी. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असेल,वेगळा अर्थ काढू नका.आंदोलनावर चर्चा होणं गरजेचं आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की,मला कल्पना नाही. मी बघितलय त्यानुसार आदरणीय शरद पवार साहेब अनुभवी नेते आहेत. त्यांनी अनेक प्रश्नांवर पुढाकार घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे,विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा असल्याचे सांगत, आंदोलन दडपण्यासाठी करण्यात आलेल्या पोलिस कारवाईचा निषेध केला, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी व्यापक रणनीती आखली जाईल,असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की,जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय शरद पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली.या भेटीचा कोणत्याही राजकीय घडामोडींशी संबंध नाही, असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आतंकवादी अशी उपमा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो,विद्यार्थ्यांचे हे आंदोलन महाराष्ट्रातही अधिक तीव्र होईल. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकत्र येऊन चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील,असे शशिकांत शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, पोलिसांसोबत साध्या वेशातील व्यक्तींनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.अशा व्यक्ती पूर्वनियोजितपणे आणल्या होत्या का, अशी शंका निर्माण होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांचा शोध घ्यावा, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी,असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.