मंडणगड : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे मंडणगड तालुकाध्यक्षपदी संतोष दाभिळकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल भाजप कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी अधिक प्रभावीपणे संपर्क साधणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्याची जबाबदारी संतोष दाभिळकर यांच्यावर राहणार आहे.
संतोष दाभिळकर यांची सामाजिक व संघटनात्मक कार्याची असलेली आवड आणि कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. मंडणगड तालुक्यात अनुसूचित जाती मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच गावागावांत पक्षाचे काम पोहोचविण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भाजप अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर तालुका अध्यक्ष दत्ताजी महाडीक सेक्रेटरी अँड सुशिल दळवी यांनी संतोष दाभिळकर यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष संतोष दाभिळकर यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला असून, अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दिले आहेत.
त्यांच्या निवडीमुळे मंडणगड तालुक्यातील भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या मंडणगड तालुकाध्यक्षपदी संतोष दाभिळकर…
