मुंबई – दिल्लीत नीट पेपर लीकप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच मंचावर आले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार घणाघात केला. यावेळी ठाकरे बंधूंनी येत्या रविवारी २६ जुलै रोजी मुंबईत विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी एका भव्य निषेध मोर्चाची अधिकृत घोषणा केली.

आम्ही २६ तारखेला शक्तीप्रदर्शन मोर्चा या मुलांना घेऊन करायचं ठरवलं आहे. मुंबईतही ही सर्व मुले एकत्र येत आहेत. आपला राग रोष व्यक्त करत आहेत. हे केंद्रालाही कळणं गरजेचं आहे. २६ तारखेला रविवारी सकाळी आम्ही मोर्चा काढत आहोत. शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत मोर्चा जाईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर देवाला साकडं घालणार आहोत. सरकारला सुबुद्धी मिळो असं साकडं घालू. तिथे मोर्चाची सांगता होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीत आंदोलक मुलींना लाठ्या-काठ्यांनी मारले गेले, खिळे लावून मारहाण झाली, कपडे फाडले गेले. सिव्हिल ड्रेसमधील गुंडांच्या हातात पोलिसांच्या काठ्या कशा आल्या? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोर्चाची रूपरेषा स्पष्ट केली, हा शक्तीप्रदर्शन मोर्चा रविवारी दादर येथील शिवतीर्थावरून (शिवाजी पार्क) सकाळी ११.३० वा. निघेल आणि श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. ही नीट पेपर लीक होण्याची तिसरी वेळ आहे. या सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून आम्ही सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहोत, असे राज ठाकरे म्हणाले. आधी काँग्रेसच्या काळात देखील असे मोर्चे निघाले. त्यावेळी देखील अनेक नेत्यांनी राजीनामे मागितले आणि तेव्हा ते दिले गेले. मात्र आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापासून सुरू झालेला हा प्रश्न आता थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींनी आंदोलकांशी आधीच चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती, असेही राज ठाकरे म्हणाले.