चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान भाजपचे गटनेते श्री. शशिकांत मोदी आणि माझ्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादाबाबत श्री. मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे; मात्र नागरिकांसमोर संपूर्ण वस्तुस्थिती येणेही तितकेच आवश्यक आहे. असा खुलासा ठाकरे सेनेचे नगरसेवक विकी नरळकर यांनी केला आहे.

सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की, माझा विरोध श्री. मोदी या व्यक्तीला नव्हता तर त्यांच्या सभागृहातील मांडणीच्या पद्धतीला होता. ज्या विषयावर यापूर्वीच चर्चा होऊन निर्णय झाला होता, तोच विषय पुन्हा विषयपत्रिकेत नसताना उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ खर्च करणे कितपत योग्य आहे, एवढाच माझा प्रश्न होता.

शहरातील खड्डे, महानगर गॅसच्या पाईपलाईनच्या चरी आणि त्यातून होणारे अपघात ही वस्तुस्थिती आम्ही कधीच नाकारलेली नाही. उलट मागील सभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती. प्रशासनाने रत्नागिरी नगरपरिषदेतील हॉट मिक्स मटेरियल चा डेमो पाहून माहिती दिली होती. एका बॅगची किंमत सुमारे ₹७०० ते ₹७५०, त्यासाठी स्वतंत्र रोलर आणि मोठा खर्च आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती पाहता हा पर्याय तातडीने व्यवहार्य नसल्याचे तेव्हाच सर्वांच्या निदर्शनास आले होते. मग त्याच विषयाची पुन्हा पुनरावृत्ती करण्यामागचा उद्देश काय, आणि जो विषय सभागृहाच्या विषय पत्रिकेत मुळात नाही तर त्या विषयावर चर्चा का हा माझा प्रश्न होता.

याशिवाय श्री. मोदी प्रत्येक वेळी केवळ “सुवर्ण भास्कर” या ठिकाणाचाच उल्लेख करत होते. म्हणून त्याबाबत खुलासा मागितला असता “सुवर्ण भास्कर पेट्रोल पंप” असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात आयसीआयसीआय बँकेसमोर, बुरुमतळी, पोलीस ठाण्यासमोर आणि शहरातील अनेक ठिकाणी असेच गंभीर खड्डे आहेत. मग निवडक ठिकाणांनाच प्राधान्य का? जनतेच्या सुरक्षेचा निकष संपूर्ण शहरासाठी समान असला पाहिजे.विरोधक म्हणून शहरहिताच्या प्रत्येक चांगल्या कामाला आमचे सहकार्य कायम राहील. मात्र त्यासाठी प्रथम सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापसातील मतभेद आणि समन्वयाचा अभाव दूर करून एकसंधपणे काम करणे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांमध्येच एकमत नसेल, तर त्याचा फटका विकासकामांना आणि नागरिकांनाच बसतो. त्यामुळे प्रथम अंतर्गत घोळ मिटवा तरच चिपळूण स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने प्रभावी वाटचाल करू शकेल.

आमचा विरोध कोणत्याही व्यक्तीला नाही तर चुकीच्या निर्णयांना आहे. व्यक्ती बदलू शकतात, पक्ष बदलू शकतात; पण जनहिताची भूमिका बदलता कामा नये. चिपळूणच्या जनतेने आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला न्याय देणे हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे.