लांजा: लांजा तालुक्यातील गवाणे चव्हाणवाडी येथील होळीचा मांड परिसरात विहिरीत पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना १२ मार्च रोजी रात्री ८ ते १३ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद अमरदीप दीपक चव्हाण (वय ३७, रा.गवाणे चव्हाणवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. अनंत तुकाराम चव्हाण (वय ५५, रा. गवाणे चव्हाणवाडी, ता.लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचे गेल्या काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडलेले हते.

दरम्यान, १२ मार्च रोजी ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, गवाणे चव्हाणवाडी येथील होळीचा मांड परिसरात अर्चना चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीत ते मृत अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.