रत्नागिरी : कोकणच्या समुद्रात पुन्हा एकदा वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर १५ ऑगस्टपासून समुद्रात उतरलेल्या मच्छीमार बोटी आता सुरक्षेसाठी किनाऱ्यावर परतल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरासह जयगड, मिरकरवाडा, बोऱ्या बंदर आणि दाभोळ बंदरातील जवळपास सर्वच मच्छीमार बोटी किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत. पुढील काही दिवस समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मात्र, मासेमारी हंगाम सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच पुन्हा मासेमारीला ब्रेक लागल्याने मच्छीमारांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. समुद्रात जाता न आल्याने मासेमारीवर अवलंबून असलेले मच्छीमार, कामगार, मासे विक्रेते आणि संबंधित व्यावसायिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. मासेमारीच्या सुरुवातीलाच बोटी किनाऱ्यावर परतल्याने मासे खरेदी-विक्रीचा कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा थेट फटका कोकणच्या मच्छीमार अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे.

एकीकडे समुद्राच्या सुरक्षेचा प्रश्न, तर दुसरीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न अशा दुहेरी संकटात मच्छीमार सापडले आहेत. त्यामुळे समुद्र कधी शांत होणार आणि मासेमारी पुन्हा कधी सुरू होणार, याकडे मच्छीमार बांधवांचं लक्ष लागलं आहे.