चिपळूण : शहरालगतच्या खेडी येथील साई प्रतिष्ठान व साई प्लाझा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ५१ हजाराचे पारितोषिक असणाऱ्या या दहीहंडीचा थरार खेर्डी-बहादूरशेख नाका दरम्यानच्या साई प्लाझा येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे लाईट शो डीजे डॉली आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा शोसह लकी ड्रॉमधून उपस्थितांना विविध बक्षिसे मिळवण्याची संधीही प्राप्त होणार आहे.
साई प्रतिष्ठानचे आधारस्तंभ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ऊर्फ अबू ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे या दहीहंडीचे यशस्वीपणे आयोजन केले जाते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कोकरे व सहकारी यांनी यंदाही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या दहीहंडी महोत्सवाचे नियोजन केले आहे.
ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रक्कम ५१ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय सलामी देणाऱ्या पथकाला २ हजार ५०० रुपये, फिरती सलामी देणाऱ्या पथकाला ३ हजार ५०० रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.
दहीहंडी प्रेमींच्या मनोरंजनासाठी लाईव्ह ऑर्केस्ट्रा शोचे आयोजन करण्यात आले आहे. लकी ड्रॉ हा या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. यातील प्रथम क्रमांकास फ्रीज, द्वितीय क्रमांकास वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकास एलईडी टीव्ही तर उत्तेजनार्थ पैठण्या देऊन विजेत्यांचा सन्मान केला जाणार आहे. तरी या दहीहंडी महोत्सवात सहभागी होऊन दहीहंडी प्रेमींनी आनंद लुटावा, असे आवाहन साई प्रतिष्ठानने केले आहे.
