चिपळूण : चिपळूण गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले असताना, चिपळूण तालुक्यातील नांदिवसे येथे यावर यशस्वी मात करण्यात आली आहे. नांदिवसे उप-आरोग्य केंद्र आणि दादर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ६ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. आरोग्य विभागाच्या योग्य समुपदेशनामुळे पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करण्यास संमती दिली. संपूर्ण चिपळूण तालुक्यातील हा पहिलाच यशस्वी प्रयत्न मानला जात आहे.
या लसीकरणाबाबत पालकांच्या मनात अनेक शंका आणि गैरसमज असल्याने सुरुवातीला कोणीही तयार होत नव्हते. मात्र, आरोग्य विभागाने हे आव्हान स्वीकारले. समुदाय आरोग्य अधिकारी के. बी. सराटे, आरोग्य सहाय्यक ए. के. यादव, आरोग्य सेविका एस. एस. देसाई, आरोग्य सेवक व्ही. बी. कडू, आणि आशा सेविका एस. एस. शिंदे व टी. जी. जंगम यांच्या पथकाने गावात जाऊन पालकांचे समुपदेशन केले. गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका आणि या लसीचे महत्त्व पटवून देत त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि ६ पालक आपल्या मुलींना लस देण्यास तयार झाले. हा संपूर्ण कार्यक्रम नांदिवसे उपकेंद्र येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. लस घेतलेल्या सर्व मुली सुरक्षित आणि निरोगी आहेत. आरोग्य पथकाच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे तालुक्यातील इतर गावांमध्येही या लसीकरणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल आरोग्य पथकाचे व सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.