मंडणगड : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा वेळास येथील विद्यार्थी संख्या आणि त्यानुसार आवश्यक शिक्षक संख्या पुरेशी असतानाही एका कार्यरत शिक्षकास बाहेर पाठविण्याबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ३ सप्टेंबर २०२६ गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मंडणगड यांचे कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर भोगल धनश्री काणे दक्षता देवकर पुजा वाडकर सुविधा महाडीक आराध्या पाडलेकर अभिलाशा कुलापकर कल्याणी दरिपकर रुचिता नरवणकर रिया पाटकर सानिया पाटील निशा वेळासकर कल्याणी दरिपकर रेखा दरिपकर हर्शाली रहाटे रिया पाटील उपस्थित होत्या सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीनतम संचमान्यतेनुसार शाळेतील विद्यार्थी-शिक्षक प्रमाण योग्य आहे. असे असतानाही तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थी हिताचा विचार न करता संबंधित शिक्षकास बाहेर पाठविण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर व अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वीही शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांवर विविध माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. आदेश तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अन्यथा लोकशाही मार्गाने शाळाबंद आंदोलन करून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी दिला आहे.