रायगड : रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील सध्याची परिस्थिती पाहता, रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करणारी बाब समोर आली आहे. रुग्णालयाचे विद्युत ऑडिटच झाले नसल्याची माहिती समोर आल्याने सिव्हिल रुग्णालयातील सुरक्षेचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या या रुग्णालयात चोवीस तास वीजपुरवठा सुरू असतो. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन यंत्रणा, व्हेंटिलेटर आणि विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे विजेवर अवलंबून आहेत. अशा ठिकाणी विद्युत यंत्रणेची सुरक्षा तपासणीच होत नसेल, तर रुग्णालय प्रशासन नेमके कोणत्या सुरक्षेच्या भरोशावर कारभार चालवत आहे?

अमरावतीतील भीषण रुग्णालय दुर्घटनेने संपूर्ण राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २४ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, उपकरणांची देखभाल आणि सुरक्षा ऑडिटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे विद्युत ऑडिट झाले आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. जर विद्युत ऑडिट झालेलेच नसेल, तर अमरावतीसारख्या दुर्घटनेतूनही प्रशासनाने धडा घेतलेला नाही का, असा संतप्त सवाल शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अमरावतीसारखी दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच विद्युत ऑडिट करून संभाव्य धोके दूर करणे गरजेचे आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.